फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग त्यांच्या लॅपटॉपचा कॅमेरा तसेच वेब कॅम वापरात नसताना कपड्याच्या तुकड्याने झाकून ठेवतात. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे माजी संचालक जेम्स कोमी कायम त्यांच्या लॅपटॉपचा कॅमेरा टेपने झाकणे पसंत करतात. विविध प्रकारच्या डिजिटल अधिकारांसाठी लढणारी संस्था अमेरिकन इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशन वापरकर्त्यांना लॅपटॉप कॅमेरे व वेबकॅम कव्हर करण्यासाठी स्टिकर्स वाटतात. पण कॅमेरा वापरात नसताना कव्हर करण्याचा या मंडळींचा इतका आग्रह कशासाठी?
कॅम्फेक्टिंग (Camfecting) म्हणजे नक्की काय?
ब्लॅकशेड्स व इतर मालवेअरच्या मदतीने हॅकर्स विविध उपकरणांमधील कॅमेराचा ताबा मिळवून छायाचित्रे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करतात. कॅमेरा ऑन असल्यास काही लॅपटॉप तसेच वेबकॅमना लाल एल.इ.डी (इंडिकेटर) सुरु राहतो. हॅकर्स हा दिवा देखील अक्षम (डिसेबल) करून टाकतात. लॅपटॉप स्टॅन्डबाय मोड वर असतो तेव्हा देखील कॅमेरा सायबर गुन्हेगारांना थेट फीड देत राहतो. यास कॅमफेक्टिंग म्हणतात.
संरक्षण कसं करायचं?
- हॅकर्स कॅमेराद्वारे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि फोटो पुनर्प्राप्त करण्यासाठी डिजिटल डिव्हाइसच्या इंटरनेट कनेक्शनचा वापर करतात. त्यामुळे, तुमच्या इंटरनेट खात्याचे निरीक्षण केल्यास तुम्हाला प्रचंड प्रमाणात डेटाचा वापर झाल्याचे दिसून येते. तुम्ही वापर केला नसून देखील खात्यात डेटा खर्च झाल्याची नोंद असल्यास तुमचे डिव्हाइस हॅक झाल्याची शक्यता असते. असे झाल्यास संगणक इंटरनेट डेटा कुठे खर्च करतो हे टास्क मॅनेजर किंवा इतर सॉफ्टवेअर वापरून त्वरित समजून घेणे गरजेचे असते.
- तुमचा डेस्कटॉप संगणक आणि लॅपटॉप वापरात नसताना बंद ठेवल्याची खात्री करा. ही उपकरणे लो-पॉवर मोड, स्लीप मोड किंवा हायबरनेशनमध्ये ठेवू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वापरात नसताना लॅपटॉप कॅमेरा आणि डेस्कटॉप वेबकॅम झाकून ठेवा. खबरदारी म्हणून, वाय-फाय राउटर देखील वापरात नसताना बंद ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
- सध्याच्या काळात जवळजवळ प्रत्येकाकडे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आणि फायरवॉल सक्रिय असतात.शक्यतो, घुसखोरी शोध (इन्ट्रुजन डिटेक्शन) प्रणाली असलेले अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करा. हे विशेष वैशिष्ट्य हॅकर्सने तुमच्या संगणकाचा ताबा मिळवायचा प्रयत्न केल्यास तुम्हाला सतर्क करते.
- आणि हो, कोणतेही सॉफ्टवेयर संगणकात डाउनलोड करण्याआधी ते सुरक्षित असल्याची खात्री करा. आपण कृपा करून लॅपटॉपचा कॅमेरा चिकटपट्टीने झाकून ठेवा!
लेखक: नित्तेंन गोखले
The column was first published in PunyaNagri, Marathi daily, on Jan 1, 2022


Leave a comment