जनतेचे प्रश्न पुणे महानगरपालिकेत रोखठोकपणे मांडणाऱ्या नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या लीनाताई पानसरे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले.
पानसरे यांनी १९८० पासून शिवसेना पक्षासाठी कार्य सुरू करून १९९२ दरम्यान मुळशी तालुक्यातून पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. पुढे शिवसेनेच्या चढत्या काळात त्यांनी तीन वेळा पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवून नगरसेवकपद भूषवले. या कार्यकाळात जयभवानीनगर झोपडपट्टीमध्ये नागरिकांसाठी अनेक सोयी-सुविधा उभ्या केल्या. संत ज्ञानेश्वर उद्यानाची संकल्पना, पायाभरणी ते उद्घाटनापर्यंतचे सर्व कार्य त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. देशी दारू दुकानांविरोधात आंदोलन तसेच दादोजी कोंडदेव पुतळा हलवण्याच्या निर्णयाविरोधात पालिका सभागृहात आंदोलन केल्याने त्या नेहमी चर्चेत राहिल्या. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक बचतगट निर्माण करून महिलांना सक्षम केले. विविध समाजघटकांमध्ये केलेल्या समाजकार्य व कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिवसेना (शिंदे गट) पुणे शहराच्या पहिल्या महिला शहरप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ही जबाबदारीही त्यांनी उत्तम रीतीने पार पाडली. भुकूम गावचे माजी उपसरपंच तानाजी पानसरे यांच्या त्या पत्नी, पंचायत समिती मुळशी तालुका मा. सभापती भानुदास पानसरे यांच्या चुलती तसेच शिवसेना कोथरूड विभागप्रमुख मयूर पानसरे व उद्योजक मंगेश पानसरे यांच्या त्या मातोश्री होत्या.

Leave a comment