भारताच्या दौऱ्यावर आले असताना ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईच्या अंधेरी परिसरातील वायआरएफ, अर्थात, यश राज फिल्म्स स्टुडिओला भेट दिली. वायआरएफ येत्या दोन वर्षांत ब्रिटनमध्ये तीन चित्रपट बनविणार असून, या चित्रपटांचे छायाचित्रण आणि पोस्ट-प्रोडक्शन ब्रिटनमध्ये पूर्ण होईल. यामुळे ब्रिटनमध्ये तीन हजार नोकऱ्या निर्माण होतील. स्टार्मर यांनी या निर्णयाची प्रशंसा करण्यासाठी स्टुडिओला भेट दिली. यश राज फिल्म्सचे कर्ताधर्ता अदित्य चोप्रा हे ब्रिटिश पंतप्रधानांना वैयक्तिकरित्या भेटले नाहीत. ते प्रसिद्धी टाळतात आणि क्वचितच सार्वजनिक ठिकाणी वावरतात. चोप्रा यांनी त्याची पत्नी राणी मुखर्जी-चोप्रा आणि कंपनीचे सीईओ अक्षय विडाणी यांना भेटण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी पाठवले. हे यश आणि मान-सन्मान मिळवण्यासाठी अदित्य चोप्रा आणि त्यांचे वडील, वायआरएफचे संस्थापक यश चोप्रा, यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत.
“डीन कीथ सायमंटन यांचे संशोधन आणि यश चोप्रा यांची अपयशाची दहा वर्षे”
डीन कीथ सायमंटन हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संशोधक आहेत. सायमंटन त्यांच्या सर्जनशीलता, प्रतिभा, उत्पादकता या पैलूंवर व्यापक अभ्यासासाठी ओळखले जातात. त्यांच्या संशोधनातून असे दिसून येते की, कलाकार, शास्त्रज्ञ आणि शोधक असलेल्या व्यक्ती त्यांचे सर्वात प्रभावी काम हे वर्षानुवर्षे प्रयत्न, प्रयोग आणि अपयशांतून मार्ग काढूनच जगासमोर आणतात. पण सायमंटन यांच्या संशोधनाचा यश चोप्रांशी काय संबंध? या प्रश्नाचे उत्तर दडले आहे, १९७९ पासून १९८९ या कालावधीत.
“अपयशाची दहा वर्षे”
चित्रपटगृहात १९५९ मध्ये प्रदर्शित झालेला बी.आर.फिल्म्स निर्मित ‘धूल का फूल’ हा दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांचा पहिला चित्रपट. पुढील काळात बी.आर. फिल्म्समधून १९७० मध्ये बाहेर पडून यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली ‘दाग’, ‘कभी कभी’ आणि ‘काला पत्थर’ हे चित्रपट बनवले. तसेच, गुलशन राय यांच्या त्रिमूर्ती फिल्म्स कंपनीसाठी दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘जोशीला’, ‘दीवार’ आणि ‘त्रिशूल’ हे चित्रपट बनवून नाव कमावले. ‘धूल का फूल’ पासून ‘काला पत्थर’ पर्यंत चोप्रा यांच्या सर्वच सिनेमांना मध्यम किंवा अप्रतिम यश मिळाले. परंतु पुढे चित्र बदलत गेले. ‘सिलसिला’ (१९८१) मध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा असूनही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्याच वर्षी, चोपडा यांनी दिग्दर्शक दिलीप नाईक यांच्या ‘नाखुदा’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. ‘नाखुदा’ बॉक्स ऑफिस फ्लॉप ठरला. पुढील वर्षी, म्हणजेच १९८२ मध्ये त्यांची कंपनी रमेश तलवार दिग्दर्शित ‘सवाल’ चित्रपट घेऊन आली. हा चित्रपट खर्च झालेली लागत परत मिळवू शकला नाही. चोपडा यांनी १९८४ मध्ये ‘मशाल’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. दुर्दैवाने दिलीप कुमारचा हा सिनेमा सुद्धा फ्लॉप ठरला. मग १९८५ मध्ये आला चोप्रा यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला ‘फासले’. पुढे १९८८ मध्ये आला ‘विजय’. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले.
“अपयशाचा सिलसिला थांबला तरी कधी?”
चोप्रा यांचे नावच यश, मग अपयश कायमस्वरूपी राहील तरी कसे? अपयशी चित्रपटांच्या मालिकेला १९८९ मध्ये आलेल्या ‘चांदनी’ ने पूर्णविराम लावला. यश चोप्रा यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले, तसेच व्यावसायिकदृष्ट्या पण चित्रपट जबरदस्त यशस्वी ठरला. दोन वर्षांनी, १९९१ साली आलेला श्रीदेवी आणि अनिल कपूर अभिनित ‘लम्हे’ हा भारतात कमी चालला, पण परदेशात मात्र खूप कौतुक मिळविले आणि पैसे कमावले. साधारण १९८७ च्या आसपास चोप्रा यांनी निर्माता फिरोज नदियाडवाला यांच्या कंपनीसाठी ‘परंपरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचे चित्रीकरण संपून तो १९९३ मध्ये प्रदर्शित झाला आणि फ्लॉप झाला. पण याचे खापर दिग्दर्शकावर फोडण्यात आले नाही कारण याच्या निर्मिती दरम्यान खूप वेळ गेला. एकामागोमाग एक कलाकार बदलण्यात आले. शेवटी चित्रपट पडद्यावर आला तेव्हा तो आउटडेटेड वाटू लागला. हा काही अडथळा ठरला नाही. पुढे यश चोप्रांचे दिग्दर्शित केलेले ‘डर’ (१९९३), ‘दिल तो पागल है’ (१९९७), ‘वीर-झारा’ (२००४) आणि ‘जब तक है जान’ (२०१२), हे सर्वच सिनेमे लोकप्रिय व बॉक्स ऑफिस हिट ठरले. त्यांनी निवडलेल्या कथांचा अभ्यास केला तर ‘चांदनी’ (१९८९) पासून पुढे दिग्दर्शन केलेल्या सर्व चित्रपटात प्रेम हा गोष्टीचा केंद्रबिंदू असतो. कदाचित म्हणूनच, चाहते आणि अनुयायींचे मत विचारले तर त्यांना चोप्रा यांचे ‘चांदनी’, ‘डर’, ‘वीर-झारा’ हे सिनेमे ७० च्या दशकातील दीवार, त्रिशूल, कभी कभी पेक्षा अधिक चांगले वाटतात.
“मान-सन्मान”
हिंदी चित्रपट तसेच कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी यश चोप्रा यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्टा) कडून त्यांना सन्मानित करण्यात आले. फ्रान्सने त्यांना लिजन ऑफ ऑनर ही पदवी देऊन सन्मानित केले. चोप्रा यांनी २००६ मध्ये ५६ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जूरी सदस्य म्हणून काम केले. स्वित्झर्लंडमधील जंगफ्राऊ रेल्वेने त्यांच्या सन्मानार्थ एक ट्रेन समर्पित केली आहे, ज्याला यश चोप्रा ट्रेन म्हणतात. ती क्लाइन शिंगेन ते जंगफ्राउजोच या स्थानकांमध्ये धावते. सर्वात मोठा मान म्हणजे कोणत्याही अभिनेता किंवा कलाकाराने यश चोप्रा यांनी त्यांच्याशी दुर्व्यवहार केल्याची तक्रार केली नाही. ही बाब त्यांच्या वर्तनाचे प्रमाणपत्र आहे. हयात असताना त्यांनी कधीच कुणाला वाईट वागणूक दिली नाही.
“पुढील पिढीसाठी केलेली तयारी”
यश चोप्रा यांच्या कामात कुटुंबाचा सहभाग पहिल्यापासूनच होता. पत्नी पॅमेला चोप्रा, मुले उदय आणि आदित्य कायमच वडिलांना सहायक म्हणून काम करत होते. थोरला मुलगा आदित्य चोप्रा २००४ पासून कंपनीचे सर्वोसर्वा म्हणून काम सांभाळत आहे. यश चोप्रा यांचा मृत्यू २१ ऑक्टोबर २०१२ रोजी झाला. परंतु चोप्रा यांनी मृत्यूपूर्वीच कंपनीमध्ये बायको आणि दोन्ही मुलांना समान हिस्सा, शेअर्स देऊन ठेवले. यामुळे कुटुंबात वादविवादाला जागाच उरली नाही. एप्रिल २०२३ मध्ये पॅमेला चोप्रा यांच्या निधनानंतर, राणी मुखर्जी चोप्रा (आदित्य चोप्रा यांची पत्नी) यांनी कंपनीत त्यांच्या सासू, पॅमेला, यांची जागा घेतली.
साधारण २००२ पासून कंपनीने वर्षाला दोन ते तीन चित्रपटांची निर्मिती सुरू करून व्यवसायाचा विस्तार केला. पोस्ट-प्रोडक्शनची कामे सांभाळण्यासाठी यशराज स्टुडिओची स्थापना २००५ मध्ये केली. यात आदित्य चोप्रा यांची मोठी भूमिका होती. तसेच, आर्थिक साहाय्य एक्सिम बँक, अर्थात, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाकडून मिळाले. याच बँकेने चोप्रा यांच्या २००४ ते २०१० दरम्यान बनविलेल्या अनेक चित्रपटांना फायनान्स केले.
सध्या कंपनी पोस्ट-प्रोडक्शन, म्युझिक राइट्स (संगीत हक्क), मार्केटिंग, स्पेशल इफेक्ट्स आणि थिएटर डिस्ट्रिब्यूशन हे पैलू हाताळते. मागील सहा वर्षांत हिट चित्रपट कमी आणि फ्लॉप्सचा आकडा जास्त असूनही यशराज फिल्म्स ही भारतातील अव्वल हिंदी चित्रपट निर्मिती करणारी कंपनी मानली जाते. कंपनीचे मूल्य ₹१०,००० कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. आज कंपनीकडे जे काही आहे, ते सर्व १९८० च्या दशकात चोप्रा सीनियर यांनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असूनही अपयशांचा सामना करत, प्रामाणिकपणे प्रेमाच्या गोष्टी सांगत पुढे जात राहण्याच्या निर्णयामुळेच आहे.
यश चोप्रा यांच्या आयुष्यातील विविध पैलूंवर लेखिका रेचेल द्वेयर यांचे ‘यश चोप्रा (जागतिक दिग्दर्शक)’ हे पुस्तक वाचण्यासाठी उत्तम आहे. वर्ष २००२ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक अनेक ऑनलाइन लायब्ररींमध्ये मोफत वाचण्यासाठी उपलब्ध आहे.
लेखक: नित्तेंन गोखले
This column was published in Prabhat Daily, November 9, 2025, edition.


Leave a comment