दुबई येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले क्रॅश-प्रूफ विमानाचे डिझाइन सध्या चर्चेत आहे. या संकल्पनेची अंमलबजावणी झाल्यास अनेक प्रवाशांचे जीव वाचतील.

दुबईच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधील एशेल वसीम आणि धरसन श्रीनिवासन या दोन विद्यार्थ्यांनी ही संकल्पना विकसित केली आहे. एअर इंडिया फ्लाईट १७१ अपघातामुळे जगात सर्वांनाच धक्का बसला. यामुळेच वसीम आणि श्रीनिवासन यांना क्रॅश-प्रूफ विमानाच्या संकल्पनेवर काम करण्याची प्रेरणा मिळाली. भारतीय वंशाच्या अभियंत्यांनी संकल्पना विकसित केली आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

पण जीव वाचविण्याची क्षमता असलेल्या या डिझाइनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत तरी कोणती?

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्रॅश-प्रेडिक्शन, विमानाच्या बाजूला एअरबॅग, रिव्हर्स थ्रस्ट, विमानातील आसन/सीट भोवती कव्हरच्या आतील बाजूस असलेले नॉन-न्यूटोनियन (द्रवपदार्थ) फ्लुइड, तसेच बचावासाठी संकेत (रेस्क्यू सिग्नल) पाठविण्याचे अनेक पर्याय, हे या संकल्पनेतील महत्त्वाचे घटक आहेत.

यात असलेले सेन्सर्स हे विमान ३,००० फूटांपेक्षा कमी उंचीवर असताना अपघात होण्याची शक्यता जाणविल्यास सिस्टिम सक्रिय करू शकतात. ही यंत्रणा विमानाच्या उड्डाणाची दिशा, इंजिनची स्थिती, उंची, वेग, तापमान, आग लागली असल्याची चिन्हे, आणि पायलट देत असलेला प्रतिसाद, यासारख्या पैलूंवर लक्ष ठेवते. इंजिनसह विमानाच्या कोणत्याही भागात तांत्रिक बिघाड झाल्यास, सिस्टम स्वयंचलितपणे दोन सेकंदात विमानाभोवती एक मोठा एअरबॅग तैनात करते. थोडक्यात, विमानाला कुशन करून आपत्कालीन लँडिंगसाठी वैमानिकांना सतर्क केले जाते. इतकेच नव्हे तर रिव्हर्स थ्रस्टसाठी ड्रॅग पॅराशूट तैनात करून विमानाची गती कमी केली जाते आणि नियंत्रित टचडाऊन, अर्थात लँडिंगची संपूर्ण तयारी केली जाते. महत्त्वाचा भाग म्हणजे पायलट केबिनमधून या एअरबॅग्ज मॅन्युअली देखील नियंत्रित करू शकतात. थोडेफार बदल केल्यावर ही यंत्रणा बोईंग आणि एअरबस, दोन्ही कंपन्यांच्या विमानात काम करते.

सध्या उपलब्ध असलेल्या प्रणालीपेक्षा यात काय वेगळे आहे?

मोठ्या प्रवाशी विमानांमध्ये सध्याच्या काळात असलेले पर्याय अपघात रोखण्यासाठी काम करतात. याउलट, प्रोजेक्ट रिबर्थ संकल्पनेत असलेले सर्वच घटक अपघात होत असल्यास विमानातील जास्तीत जास्त लोक वाचविण्याकरिता डिझाइन केले आहेत. विमानाचे महत्त्वाचे घटक नियंत्रणाबाहेर गेले तरीही विमानाला आणि आतील प्रवाशांना सुखरूपपणे जमिनीवर आणून सोडण्याचे सामर्थ्य या प्रणालीत आहे. जणू विमानातील लोकांना पुनर्जन्म मिळतो. म्हणून या संकल्पनेचे नाव रिबर्थ ठेवण्यात आले. ही एआय-संचालित क्रॅश सर्व्हायव्हल सिस्टम संकल्पना ‘जेम्स डायसन पुरस्कार’ २०२५ मध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाली आहे. तूर्तास तरी ही प्रणाली ड्रॉइंग बोर्डवर आहे, आणि संकल्पना मॉडेलच्या स्वरूपात आहे. हे सिस्टम सध्या वापरात असलेल्या विमान ताफ्यांमध्ये आणि नवीन विमानांमध्येही बसवता येईल.

अंमलबजावणीतील अडचणी

रिबर्थ डिझाइनमधील पाच घटक विविध भागात जोडण्यासाठी विमानाच्या रचनेत मोठे बदल करावे लागतील. तसेच, नवीन बसविलेल्या घटकांमुळे विमानाच्या फ्यूजलेज, अर्थात, लांब नळीसारख्य दिसणाऱ्या भागावर पडणाऱ्या वजनात लक्षणीय वाढ होईल. यामुळे इंधनाचा वापर आणि प्रत्येक फेरीचा खर्च वाढेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बदल करण्याकरिता विमान कंपन्यांना तसेच एअरलाइन्सना वेळ आणि पैसे खर्च करावे लागतील, असे मत वैमानिक अभियंते मांडतात. प्रणाली सक्रिय झाल्यानंतर विमानावर होणाऱ्या इतर परिणामांचा अभ्यास करण्याची गरज देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे.

विमानांमध्ये बिल्ट-इन पॅराशूट

आपत्कालीन परिस्थितीत पॅराशूटचा वापर करून विमान सुखरूप जमिनीवर आणले जाऊ शकते का? होय, आयकॉन ए५, सिरस व्हिजन जेट, आणि सिरस एस.आर सीरीज विमानांमध्ये बिल्ट-इन पॅराशूट सिस्टम असते. ही यंत्रणा या लहान जहाजांसाठी पुरेशी ठरते. वर्ष २०१९ पर्यंतच्या आकडेवारीप्रमाणे, सिरस एअरफ्रेम पॅराशूट यंत्रणा असलेली २४ विमाने क्रॅश झाली आणि यातील २१ विमाने किरकोळ दुरुस्तीनंतर पुन्हा सेवेत रुजू झाली. या आकडेवारीमधून पॅराशूटचा वापर करून अख्खे विमान वाचवता येऊ शकते यावर शिक्कामोर्तब होते. गेल्या काही वर्षांत अमेरिकेच्या  एफ.ए.ए, अर्थात फेडरल एविएशन ऑथॉरिटीने अनेक पॅराशूट-आधारित विमान सुरक्षा प्रणालींना मान्यता दिली आहे. बीआरएस कंपनीचे सिरस एअरफ्रेम पॅराशूट सिस्टिम, व बीआरएस-६००, बीआरएस-८०० तसेच जीआरएस ६/६०० एसडी आणि जीआरएस-६/६५० एसडी, ही सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांच्या यादीत झळकतात. ह्या सिस्टिम्स हलक्या आणि लहान विमानांसाठी डिझाइन केलेल्या आहेत.

वाहतुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय हा विमानच

वाहतुकीदरम्यान होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी पाहिली तर रस्त्यावर प्रवासात सर्वात अधिक मृत्यू होतात. याउलट, विमान वाहतुकीवर लागू होणाऱ्या कडक नियम, वैमानिक प्रशिक्षण, आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विमान अपघात आणि प्रवाशांच्या मृत्यूंची संख्या कमी आहे. डिजिटल ट्विन्स (आयओटी) सारख्या तंत्रज्ञानाने विमाने अधिक सुरक्षित झाली. तूर्तास, प्रत्येक विमानात टक्कर टाळण्यासाठी यंत्रणा, हवामान रडार, इंजिन बॅकअप सिस्टम, आणि इतर सुरक्षा प्रणाली आहेत. विविध विभागांकडून, तसेच एअरलाइन्सकडून विमानाचे रिअल-टाइम आधारावर निरीक्षण केले जाते. पुढील काळात प्रोजेक्ट रिबर्थ सारख्या संकल्पना विमानातून प्रवास अधिक सुरक्षित करतील.

लेखक: नित्तेंन गोखले

This column was published in Prabhat Daily Marathi, October 17, 2025, edition

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.