मुंबईतील गिरणी मालक वल्लभ ठक्कर खून प्रकरणातून प्रेरणा घेऊन बनविलेल्या कथानकावर राम गोपाल वर्मा शोले २ (राम गोपाल वर्मा की आग) चित्रपट बनवणार होते. परंतु, दुर्दैवाने वर्मा यांनी दुसरी कथा वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात खराब चित्रपट, राम गोपाल वर्मा की आग, बनविला. याबाबतचे काही पैलू जाणून घेऊया.


निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे रामू म्हणूनही ओळखले जातात. रात, रंगीला, सत्या, भूत, कंपनी, सरकार, फूक, सरकार राज असे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या रामू यांनी जवळपास एक दशकात बॉक्स ऑफिस हिट चित्रपट दिलेला नाही. तरीदेखील त्यांची फॅन फॉलोविंग अफाट आहे. त्यांची मुलाखत काही तासांत युट्युबवर लाखो व्ह्यूज मिळवते कारण वर्मा यांच्याकडे चाहत्यांना सांगण्यासाठी अनेक रंजक गोष्टी आहेत. ट्रेड विश्लेषक कोमल नहाटाशी नुकत्याच झालेल्या मुलाखतीत त्यांनी मुंबईतील गिरणी मालक वल्लभ ठक्कर यांच्या खून प्रकरणाचे शोले २ च्या कथेत कसे रूपांतर होणार होते याचा गौप्यस्फोट केला.

“वल्लभ ठक्कर कोण होते?”

वल्लभ ठक्कर हे बांधकाम क्षेत्रात सक्रिय होते. त्याचबरोबर ते रघुवंशी मिल्सचे मालक देखील होते. ठक्कर यांनी १९९३ मध्ये नयन मेहता यांच्याकडून ही १९८९ पासून बंद असलेली मिल विकत घेतली. त्यांच्या खुनानंतरच्या पोलिस तपासात असे समजले की त्यांनी मालमत्तेतील काही भाडेकरूंना बाहेर काढण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेतली. हुसेन झैदी यांच्या ‘बाय्कुला टू बँकॉक’ या पुस्तकात या खुनाचा उल्लेख आहे. गुंड अरुण गवळी यांनी रघुवंशी मिलमध्ये ३० लाख रुपये गुंतवले होते असे देखील झैदी सांगतात. ठक्कर यांची १७ एप्रिल १९९७ रोजी राजेंद्र मंधर सडविलकर आणि राजेश सुभाषचंद्र रॉय यांनी त्यांच्या गाडीत गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांच्या आरोपपत्रात दोघे अरुण गावलीचा उजवा हात सदा पावले, उर्फ मामा, याच्यासाठी काम करत असल्याचे नमूद केले आहे. तत्कालीन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे (आरएमएमएस) अध्यक्ष यांनी देखील या हत्येचा मिलशी काही संबंध नसून ती वैयक्तिक व्यवहारातील वादामुळे झाली असल्याचा दावा केला. तसेच, भाडेकरूंना बाहेर काढण्याच्या बदल्यात ठक्कर यांच्याकडून ठरलेली रक्कम न आल्यामुळे ही हत्या झाल्याचे सांगितले जाते.

“शोले चित्रपटाची कथा आणि वल्लभ ठक्कर हत्याकांड यातील साम्य”

गब्बरची टोळी ठाकूरच्या कुटुंबावर हल्ला करून त्यांना मारून टाकते. हल्ल्यादरम्यान गब्बर स्वतः ठाकूरचे दोन्ही हात कापून टाकतो. गब्बरने सगळे खून केले माहीत असून स्वतः साक्षीदार असून देखील ठाकूर आणि पोलीस काहीच करू शकत नाहीत. बदला घेण्याकरिता ठाकूर जय आणि वीरू यांना पैसे देऊन गब्बरला पकडण्यासाठी पाठवतो.

रामू यांनी कोमल नहाटांशी बोलताना काही तथ्ये मांडली, त्यातून शोले चित्रपट आणि ठक्कर केस मधील सारखेपणा समजतो. वल्लभभाई यांच्या कुटुंबातील एक जण अफाट श्रीमंत होता. त्याला वल्लभभाईचा खून कोणी केला माहीत होते. पण ती व्यक्ती एकटी काहीच करू शकत नव्हती. तिच्याकडे पाण्यासारखा पैसा होता. पण, शोले चित्रपटातील ठाकूरसारखी ती पण वल्लभभाईच्या खूनाचा बदला घेण्यास असमर्थ होती.

सरकारी यंत्रणेतून न्याय मिळत नाही म्हणून तिने अंडरवर्ल्डच्या शार्पशूटर्सशी संपर्क साधून त्यांना वल्लभभाई ठक्कर यांना मारणाऱ्याला संपवायची सुपारी देण्याचा प्रयत्न केला. यामुळे वल्लभभाई ठक्कर खून प्रकारातील काही पैलूंचा वापर शोले चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यासाठी करण्याचा विचार वर्मा यांनी केला होता. दुर्दैवाने, काही कारणांमुळे ही कथा वापरली गेली नाही. लेखक जोडी साजिद-फरहाद यांनी ‘आरजीव्ही की आग’ साठी एक वेगळी कथा लिहिली, आणि वर्मा यांनी त्यावर मोठा फ्लॉप चित्रपट बनविला.

“वास्तविक जीवनातील किस्स्यांचे चित्रपटात रूपांतर”

राम गोपाल वर्मा सहजपणे वास्तविक जीवनात घडणाऱ्या घटनांचे चित्रपटाच्या कथेत रूपांतर करतात. त्यांनी अब तक ५६, कंपनी, सत्या यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून हेच केले. राम गोपाल वर्मा यांची टीम पटकथा लिहिताना निवृत्त पोलिस अधिकारी, पत्रकार, राजकारणी आणि सेवेत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करते. यामुळे त्यांच्या कथांमध्ये वास्तववाद आणि सत्यता सुनिश्चित होते. वर्मा यांच्याकडे असलेली माहिती सार्वजनिकरीत्या कुठेच उपलब्ध नसते.

कदाचित, वल्लभ ठक्कर प्रकरणावर आधारित कथेने शोलेची जादू पुन्हा निर्माण करण्यात मदत केली असती. ही कथा राम गोपाल वर्मा विसरले नाही. सध्या त्यांनी या प्रकरणावर नवीन चित्रपट बनवण्यासाठी पुन्हा काम सुरू केले आहे. याशिवाय, वर्मा यांनी अलीकडेच मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख भूमिकेसह ‘पोलिस स्टेशन मे भूत’ नावाचा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट बनवत असल्याचे देखील जाहीर केले आहे.

“ठक्कर खून प्रकरण तपासाचा शेवट कसा झाला?”

ठक्कर खून प्रकरण राज्य सरकार व मुंबई पोलिसांसाठी चिंतेचा विषय बनला. विशेष पथकातील तीन अधिकारी, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा, सदा पावलेच्या मागे लागले. सप्टेंबर १९९७ दरम्यान, विजय साळसकर यांनी पावलेचा घाटकोपर परिसरात एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. पुढील काळात कोर्टात राजेंद्र मंधर सडविलकर आणि राजेश सुभाषचंद्र रॉय यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.

लेखक: नित्तेंन गोखले

My column was first published in Prabhat Daily, on May 11, 2025

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.