सध्या चाचण्या पूर्ण करून जगभरातील विविध रस्त्यांवर धावत असलेल्या, ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या, पाच हेवी ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्स बाबत माहिती जाणून घेऊया.
लांब पल्ल्याचे माल वाहतूक करणारे ट्रक बहुतेक देशांमध्ये प्रदूषणाचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत.संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमच्या (युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम) आकडेवारीनुसार, रस्त्यावरील पार्टिक्युलेट मॅटर, ब्लॅक कार्बन उत्सर्जन, आणि ऑन-रोड नायट्रोजन ऑक्साईड, तसेच अन्य प्रकारचे वायू प्रदूषण माल वाहतूक करणाऱ्या उच्च शक्ती ट्रक्स मुळे होते. अशा वायू प्रदूषणाचा सामना करण्यात इलेक्ट्रिक ट्रक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. वर्ष २०३३ पर्यंत जागतिक इलेक्ट्रिक ट्रक मार्केट ७८ अब्ज डॉलर्स पर्यंत पोचेल. इलेक्ट्रिक ट्रक्स रस्त्यात धावताना देखील दिसू लागलेत.
“व्होल्वो एफएच इलेक्ट्रिक”
या यादीची सुरुवात व्होल्वोपासून झालेली योग्य ठरते कारण कंपनीचे ४६०० पेक्षा अधिक बॅटरी-इलेक्ट्रिक ट्रक जगभरातील विविध रस्त्यांवर चालवले जात आहेत. व्होल्वोचे एकूण आठ इलेक्ट्रिक ट्रक मॉडेल्स बाजारात आहेत. तथापि, लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी योग्य असलेला एफएच इलेक्ट्रिक ट्रक सर्वात जास्त लोकप्रिय.
ट्रकची क्षमता ४४ टन आहे. उत्कृष्ट ऑन बोर्ड लिथियम-आयन बॅटरीची रेटिंग ५४० किलोवॅट तास आहे. संपुर्ण चार्ज झाल्यावर ट्रक ८० किमी प्रति तासाच्या सरासरी गतीने ३४५ किलोमीटर अंतर चालतो. चाचण्यांमध्ये असे दिसून आले की वाटेत काही मिनिटे चार्जिंगसाठी थांबल्यास हे ट्रक दररोज ५०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात.
व्होल्वो एफएच इलेक्ट्रिक वाहतूकदारांना वारंवार चार्जिंगसाठी न थांबता लांबचा प्रवास करण्यास सक्षम करते. स्वयंचलित गिअरबॉक्स असलेल्या या ट्रकने सर्व चाचण्या पूर्ण केल्या आहेत. निवडक ग्राहकांना गेले दोन वर्ष ही चालवता देखील अली. ही गाडी २०२५ च्या उत्तरार्धात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
“बीवायडी क्यू-१-आर”
बीवायडी, अर्थात, बिल्ड युवर ड्रीम्स ही एक चीनी कंपनी आहे. या कंपनीने एक उत्तम बॅटरी उत्पादक म्हणून आपला प्रवास सुरू केला. नंतरच्या काळात अप्रतिम फिचर्स असलेल्या ई-कार्ससाठी जगभरात प्रसिद्धी कमावली. सध्या बीवायडी चर्चेत आहे ते मात्र बीवायडी क्यू-१-आर हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रकसाठी. या ट्रॅकने अनेक चाचण्यांतून स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले आहे.
क्यू-१-आर एकूण ४० टन वजन वाहून नेऊ शकते. या ईव्ही मध्ये २५५ किलोवॅट अवर्स क्षमतेची लिथियम-आयन फॉस्फेट बॅटरी आहे. चार्जिंग स्टेशन १२० किलोवॅट डीसी क्षमतेचे असल्यास बॅटरी २.५ तासात संपूर्ण चार्जे होते. या जोरावर ट्रक न थांबता ८५ किमी प्रतितास वेगाने २०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतो. ट्रकच्या पॉवरट्रेनची क्षमता २८२ बीएचपी आहे.
कंपनीने काही महिन्यांपूर्वी भारताच्या अदानी पोर्ट्सना ३०० क्यू-१-आर इलेक्ट्रिक ट्रक्सची डिलिव्हरी पूर्ण केली.
“ऱ्हायनो ५५३६-इ”
ऱ्हायनो ५५३६-इ आयपीएल टेक इलेक्ट्रिकने (मुरुगप्पा ग्रुपची शाखा) भारतात विकसित केलेला मोठे वजन वाहण्याची क्षमता असलेला (हेवी ड्युटी) पहिला इलेक्ट्रिक ट्रक. हरियाणातील मानेसर येथे कंपनीच्या कारखान्यात विकसित केलेल्या या ट्रकची वजन वाहण्याची एकूण क्षमता ५५ टन आहे. वाहनाची ३६० हॉर्सपॉवर मोटर या ट्रकला ९० किमी प्रति तास या गतीने धावण्यास सक्षम करते. ट्रकमध्ये २५८ किलोवॅट आवर्स क्षमतेची लिथियम-आयन फॉस्फेट बॅटरी आहे. ही साधारण ९० मिनिटांत ० ते १०० टक्के चार्ज होते. १२ स्पीड ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन असलेला हा ट्रक एकदा बॅटरी संपूर्ण चार्जे केल्यावर १८५ किलोमीटर धावतो (जाताना रिकामा आणि येताना माल भरलेला).
वाहनाचे ड्राइव्हट्रेन, एरोडायनॅमिक कार्यक्षमता, पर्यावरणीय घटक, तसेच ट्रक मध्ये असलेल्या सामानाच्या वजनाप्रमाणे गाडीच्या एकूण धावण्याच्या क्षमतेवर, वेगावर परिणाम होतो.
कंपनी या वाहनावर विमा, वाटेत बंद पडल्यास सहाय्य (रोड साइड असिस्टेंस), त्याचबरोबर, गाडीच्या महत्वाच्या भागांसाठी पाच वर्षांची वॉरंटी देत आहे.
“स्कॅनिया बीइवी (२५ पी)”
स्वीडिश कंपनी स्कॅनियाने युरोपमध्ये उल्लेखनीय नाव कमावले आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक बसेस भारतात देखील पसंत केल्या जातात. सध्या हे नाव चर्चेत आहे ते इलेक्ट्रिक ट्रक्स मुळे. यामधील बीइवी (२५ पी) मॉडेल ट्रक्स ग्राहकांसाठी उपलब्ध असून गेल्या दोन वर्षांपासून युरोपमधील विविध देशांच्या महामार्गांवर धावत आहेत. यातील (तीन मोटर्स) इंजिनची एकत्रित क्षमता ५५० ब्रेक हॉर्सपॉवर असून, हा ट्रक ४x२ ट्रॅक्टरसारखे आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यास हा ६०-टन भार घेऊन १८० किलोमीट चालू शकतो.

बॅटरीची क्षमता ४६८ किलोवॅट प्रति तास असून ३७५ किलोवॅट चार्जेर वापरल्यास बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी ९० मिनिटे लागतात. स्कॅनिया गाडीत वापरल्या जाणाऱ्या, साधारण ४००० किलो वजन असलेल्या, लिथियम-आयन बॅटऱ्यांचे उत्पादन स्वतःच करते.
स्कॅनिया इलेक्ट्रिक ट्रक ४०, ६०,६४,७४ आणि ८० टन (माल वाहण्याची क्षमता) व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. केबिन, एक्सल कॉन्फिगरेशन, मोटर्स आणि बॅटरीची क्षमता ग्राहकाच्या विशिष्ट ऑपरेशनल आवश्यकतानुसार बदलली जाऊ शकते. चालवताना वाहन बिलकुल आवाज करत नाही. पण याची किंमत मात्र स्कॅनियाच्या डिझेल ट्रकपेक्षा तिप्पट आहे.
“डेमलर फ्रेटलाइनर इ-कॅस्केडिया (क्लास ८)”
ऑक्टोबरमध्ये, डेमलर ट्रक नॉर्थ अमेरिका या कंपनीने अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील रेयेस बेव्हरेज ग्रुपला (आरबीजी) २० बॅटरी-इलेक्ट्रिक डेमलर फ्रेटलाइनर इ-कॅस्केडिया (क्लास ८) ट्रक सुपूर्त केले. या इ-ट्रकच्या ‘टॅन्डम ड्राइव्ह’ आवृत्तीचे इंजिन (मोटर) ४७० एचपी आउटपुट देते. वाहनाची एकूण ४० टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. बॅटरी क्षमता आणि एक्सल कॉन्फिगरेशन ग्राहकाच्या गरजेनुसार समायोजित केले जाते. सर्वात मोठ्या बॅटरीची क्षमता ४३८ किलोवॅट प्रति तास आहे. सरासरी ९० मिनिटे चार्जिंग केल्यास बॅटरी ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर ट्रक ३५४ किलोमीटरपर्यंत धावू शकतो. गेल्या दोन वर्षांत डेमलर ट्रक नॉर्थ अमेरिका या कंपनीने १०० पेक्षा जास्त फ्रेटलाइनर इ-कॅस्केडिया ट्रक विकले आहेत. त्यापैकी बहुतेक ग्राहक लॉजिस्टिक कंपन्या आणि अमेरिकेतील प्रमुख एफएमसीजी ब्रॅण्ड्स असल्याने या वाहनाची गुणवत्ता उत्तम असल्याबाबत काहीच शंका नाही.
“चीनच्या बॅटऱ्यांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने वाटचाल”
ई-ट्रकमध्ये बॅटरी हा सर्वात महाग घटक आहे. लिथियम-आयन फॉस्फेट असेल तर कमी खर्चात दर्जेदार बॅटरी बनते. यामुळेच, युरोपमधील ट्रक निर्माते मोठ्या संख्येने आशियामध्ये, खासकरून चीनमध्ये, उत्पादित बॅटरीवर अवलंबून असतात. तथापि, टेस्ला, डेमलर, व्होल्वो आणि स्कॅनिया येत्या काळात त्यांच्या इन-हाउस बॅटरी उत्पादनाचा विस्तार करत आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील ईव्ही बाजारात उतरवलेल्या कंपन्या लिथियम-आयन फॉस्फेट बॅटरीसाठी चीन वरील अवलंबित्व कमी करत आहेत. यामुळे ट्रकच्या किमती देखील कमी होतील.
“भारतात कोणते पर्याय उपलब्ध आहेत?”
देशात टाटा, अशोक लेलँड, ऑलेक्ट्रा आणि आयशर या ब्रँडकडेही ई-ट्रक आहेत. परंतु, त्यांची सामान वाहण्याची क्षमता १० टनांपेक्षा कमी असून या मेडीयम ड्युटी ट्रक आहेत. वरील पाच हेवी लोड ट्रकपैकी सध्या भारतात ऱ्हायनो ५५३६-इ आणि बीवायडी क्यू-१-आर उपलब्ध आहेत.
लेखक: नित्तेंन गोखले
This column was first published in Prabhat Daily (Pune), on January 8, 2025.


Leave a comment