नित्तेंन गोखले

पंकज, राजकुमार आणि छोटू नावाच्या तीन गुन्हेगारांनी पूर्वनियोजन करून 11 ऑक्टोबर रोजी हरिद्वार जिल्हा कारागृहातून पळून जाण्याचा कट रचला. रामलीलेत वानरांची भूमिका निभावताना फरार होण्यात तिघातील दोघे यशस्वी झाले. या घटनेचा संबंध दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या ‘नो प्रॉब्लेम’ या हिंदी चित्रपटातील एका दृश्याशी आहे, पण कसा? हेच जाणून घेऊयात.

वास्तववादी चित्रपट असल्यास त्यातील अनेक बाबींशी प्रेक्षक रिलेट करू शकतात. याउलट, विनोदी सिनेमात दाखविलेल्या गोष्टी व किस्से हे सहसा मनोरंजनासाठी, लोकांना हसवण्याच्या हेतूने लिहिलेले असतात. यातील गोष्टी खर्‍या आयुष्यात घडणे कठीणच. परंतु काही दिवसांपूर्वी असा एक अशक्य किस्सा घडल्याचे बातम्यात समजले.

रील टू रिअल

अक्षय खन्ना, संजय दत्त, परेश रावल आणि अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला हिंदी विनोदी चित्रपट ‘नो प्रॉब्लेम’ (2010) बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही. पण, हा चित्रपट मजेदार नक्कीच आहे. या चित्रपटात दाखवलेली (ऑनस्क्रीन) घटना थोड्याफार फरकाने हरिद्वार जिल्हा कारागृहात घडली.

हरिद्वार घटनेचा ‘नो प्रॉब्लेम’ चित्रपटाशी संबंध काय? तर ‘नो प्रॉब्लेम’ मधील एका दृश्यात, सुपर कॉप अर्जुन (अनिल कपूर) अचानक येऊन यश (संजय दत्त), राज (अक्षय खन्ना) आणि मामाजी (परेश रावल) यांना खुनात सहभागी असल्याच्या कारणाने अटक करतो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिघे तुरुंगातून पळून जाण्याची योजना आखतात. कटाचा एक भाग म्हणून त्यांच्या चित्रपट दिग्दर्शक असलेल्या मित्राला तुरुंगात खर्‍या कैद्यांच्यात एक गाणे शूट करण्यास सांगतात. गाण्याचे चित्रीकरण करताना नाचत नाचत तिघे तुरुंगातून पळून जातात. तुरुंगाचे अधिकारी हे कैदी गाण्याचा भाग म्हणून पळत असल्याचे समजून काही न करता नुसते एकमेकांकडे बघत बसतात. हरिद्वारच्या तुरुंगात असेच काहीसे घडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज, राजकुमार आणि छोटू यांनी तुरुंगात होणार्‍या ‘रामलीला’मध्ये वानर सेनेच्या वानरांची भूमिका साकारण्याची इच्छा जेल अधिकार्‍यांसमोर व्यक्त केली. नाटकाचा भाग म्हणून, त्यांनी सीता मातेला वाचवण्यासाठी शिडी वापरून भिंतीवर चढणे अपेक्षित होते. याकरिता त्यांनी दोन शिड्या कापडाचा तुकडा वापरून जोडल्या. ती वापरून पंकज आणि राजकुमार भिंतीवर चढून पळून गेले. दुर्दैवाने, दोघांनंतर छोटूची शिडीवर चढण्याची पाळी आली तेव्हा शिडी तुटली आणि तो जेलमध्ये अडकला. सुरुवातीला काय झाले हे कोणालाच समजले नाही. शिडीवरून भिंतीवर चढणे हा नाटकाचा भाग असल्याचे सर्वांना वाटले. हरिद्वार जिल्हा कारागृहातील तुरूंग अधिकारी रामलीलाच्या कामात मग्न होते. त्यांना कशाचेच भान नव्हते. काही वेळानी दोघे परत आले नाहीत म्हणून सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेज पाहिल्यावर पोलिसांना त्यांची चूक लक्षात आली. ‘नो प्रॉब्लेम’ चित्रपटातील दृश्य नेमके हेच दाखवते: अनिल कपूर आणि इतर पोलीस नाचण्यात व्यस्थ असल्याने कैदी पळून गेल्याचे त्यांना समजत नाही.

गुन्हेगारांच्या शोधासाठी विशेष पथक

आरोपी पंकज हा पळून जाण्याआधी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, तर रामकुमार चौहानवर अपहरण आणि खंडणीची केस आहे. विचित्र बाब म्हणजे पंकज आणि छोटू कागदपत्रांमध्ये स्वतःचे आडनाव वापरत नाहीत. या कैद्यांवर विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल करून एफआयआर नोंदविण्यात आली आहे. कैद्यांना शोधून अटक करण्यासाठी हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) प्रमेंद्र डोवाल यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. याव्यतिरिक्त, उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

पण, स्वतःचे कर्तव्य पार पाडण्यात असक्षम ठरलेल्या पोलिसांचे काय? प्रभारी अधीक्षक/जेलर प्यारेलाल आर्य आणि उप जेलर कुंवर पालसिंग यांच्यासह एकूण सहा तुरूंग अधिकार्‍यांना कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. भारतात दरवर्षी अनेक कैदी पळून जाण्यात यशस्वी होतात. एनसीआरबीच्या (नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो) आकडेवारी प्रमाणे, सन 2022 दरम्यान एकूण 257 कैदी पळून गेले. यामध्ये पोलीस कोठडीत असलेले, न्यायालयीन कोठडीत असलेले, तसेच तुरुंगाच्या आवारातून पळून गेलेल्यांचा समावेश आहे. काही प्रकरणात कैदी कारागृहातून किंवा पोलीस कस्टडीतून भ्रष्ट पोलिसांच्या मदतीने पळाल्याचे किस्से देखील आहेतच.

कैदी फरार होणे हा देशासाठी नवीन प्रकार नाही. परंतु कारागृह अधिकार्‍यांना मूर्ख बनवून, नाचत-नाचत पळून जाणे हे निराळेच. फरार असलेल्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना कदाचित लवकरच यश येईल. मात्र, तूर्त तरी एखाद्या चित्रपटात दाखवलेली (ऑनस्क्रीन) घटना खर्‍या आयुष्यात, अर्थात, ऑफस्क्रीन झाल्याचे पाहायला मिळाल्याचा आनंद ह्या बातमीने अनेक लोकांना दिला, हेही सत्यच.

This column was first published in Pune’s Prabhat Daily, in October 18, 2024 edition

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.