पुणे आणि लगतच्या परिसरातील वायू व जल प्रदूषण का कमी होत नाही? कदाचित या प्रश्नाचे उत्तर दडलंय ते दिवाळीच्या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एम.पी.सी.बी) कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून मिळणाऱ्या मोठ्या-मोठ्या मिठाई बॉक्सच्या संख्येत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पिंपरी चिंचवड आणि पुणे, ही महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी दोन आहेत. IQ Air या संस्थे प्रमाणे, पिंपरी चिंचवडने तर भारतातील पहिल्या पाच सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत अनेकदा स्थान मिळवले आहेच.
वायू प्रदूषण तज्ज्ञ सांगतात पी.एम २.५ ची पातळी वाढली की लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या वायू प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या प्रमुख कारणांपैकी २ म्हणजे विविध कारखानमुळे होणारे प्रदूषण व इमारत बांधकाम.
जल प्रदूषण वाढवण्यात देखील कारखाने व बांधकाम व्यावसायानी अव्वल स्थान पटकावले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे सर्व पैलू, परिणाम मान्य केले आहेत आणि एक प्रदूषण विरोधी कृती योजना लागू केली आहे. पण हा एक कागदी घोडा वाटतो. वायू आणि जल प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसाईकांवर एम.पी.सी.बी अधिकाऱ्यांचे प्रेम त्यांच्या कामातून आणि बोलण्यातून जरा जास्तच दिसते.
परत वळू एम.पी.सी.बी पुणे कडे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वाकडेवाडी पुणे येथील कार्यालयात या वर्षी माझ्या किमान ५ चकरा मारून झाल्या.त्याचे कारण म्हणजे तळेगाव दाभाडे येथील नम्रता ग्रुपच्या ताब्यात असलेली हॅपी सिटी वराळे सोसायटी.
मी सोमनाथ निवृत्ती मराठे, रा वारळे. ता मावळ जि. पुणे येथे माझी वडिलोपार्जित मालकी हक्काची व प्रतेक्ष ताबेवहिवाटीची जमीन मिळकत (सवें नं ४५/१/२) आहे. हॅपी सिटी वराळे सोसायटी एस.टी.पी चे पाणी शेतात जमत असल्याने मी गेली २ वर्ष भातपिक व हरभरा शेती करू शकलो नाही.
शेतात येत असलेल्या सांड पाण्याबाबत बिल्डरकडे वारंवार तक्रार करून उपयोग झाला नाही. नाइलाजास्तव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे धाव घेतली. दुसऱ्यांदा तक्रार केल्यावर कार्यालयातर्फे केलेल्या पहाणीदरम्यान एस.टी.पी कंपाऊंड वॉलच्या बाजूने पाणी निघत असल्याचे मंडळाने पत्रात कबूल केले. ऑगस्ट महिन्यात बिल्डरने एस.टी.पी मधून होणारी गळती तपासून, दुरस्ती करून मंडळाला अहवाल देण्याचे आश्वासन दिले.
परंतु आज सुद्धा पाण्याची गळती थांबलेली नाही (सोबत फोटो जोडत आहे). माझी जमीन बेकार व निरउपजिव झालेली आहे. हॅपी सिटी वराळे सोसायटी बोहोती असलेल्या माझ्या दुसऱ्या शेत जमिनीचे देखील गेल्या पाच वर्षात खूप नुकसान झालेले आहे. यांचा सिमेंटचा मलबा व इतर कचरा अनेक महिने माझ्या शेतात पडून होता. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पी.एम.आर.डी ए) ने नोटीस जरी केल्यावर शाहने हा मलबा हटवला.
वराळे ग्रामपंचायत बरोबर तळेगाव दाभाडे नगरपरिषद सुद्धा यांच्यावर फिदा आहे. नम्रता ग्रुपसाठी रस्त्यातील नाल्यांची दिशा बदलून टाकली जाते किंवा नाले बुजवले जातात. गेल्या काही वर्षात नम्रता ग्रुप (शाह कुटुंब) मुळे तळेगाव दाभाडे, वराळे, कामशेत भागात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यांच्या विरोधात कोर्टात काही केसेस सुरु आहेत.
भ्रष्टाचार महामंडळ?
माझ्या शेतात पाणी शिरते ह्याचे अनेक पुरावे असताना देखील एम.पी.सी.बी दीपक व शैलेश शाह यांच्यावर का कारवाई करत नाही? शाह कोणत्या बड्या नेत्याचा जावई किंवा मेव्हणा आहे? सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे म्हणून सर्वांना न्याय मागायला कोर्टात धाव घ्यावी लागत असेल तर मग कशाला हवे एम.पी.सी.बी? कशाला जनतेच्या पैशाची उधळपट्टी एम.पी.सी.बी कर्मचाऱ्यांच्या पगारावर? एखाद्याला सरकारी नोकरी लागल्यावर त्याचे अक्खे गाव दिवाळी साजरे करते याचे नवल वाटू नये.
लेखक: सोमनाथ निवृत्ती मराठे (भ्रमणध्वनी क्रमांक-96731 30006)
कंटेंट प्रोड्यूसर, एडिटर: नित्तेंन गोखले (पत्रकार)

Leave a comment