स्वतःचा मुलगा, पती किंवा भावाने मरण्यासाठी युद्धभूमीवर जाऊ नये यासाठी महिला सरकारविरोधात आक्रमक होण्यास सुरुवात झाल्याचे दिसते.
रशियातील धाडसी स्त्रिया पुतिन यांच्या युक्रेन वरील आक्रमणाविरोधात उभ्या आहेत. मार्च महिन्यापासूनच, रशियामधील महिला विविध शहरांमध्ये, अगदी क्रेमलिन (रशियन सत्तेचं केंद्र ) समोर देखील निदर्शने करत आहेत.
“स्वतःच्या मुलाला, नवऱ्याला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता युद्ध क्षेत्रात उतरण्यास तयार”
अमेरिकेच्या सर्वोच्च लष्करी जनरलपैकी एक, मार्क मिली यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, या वर्षी फेब्रुवारीपासून सुमारे १००,००० रशियन सैनिक जखमी किंवा ठार झाले आहेत.
रशियन लष्करी अधिकार्यांनी त्यांच्या जखमी किंवा मृत सैनिकांच्या आकडेवारी बाबत गुप्तता बाळगली आहे. तथापि, अनेक जखमी सैनिक स्वतःच्या नातेवाईकांशी संपर्क साधून मदतीस येण्यास सांगत आहेत. अशा परिस्थितीत प्रियजन त्यांचा बचाव करण्यासाठी, त्यांना युद्ध क्षेत्रातून परत घरी आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसतात.
पत्नीचे पतीवर असलेले जीवापाड प्रेम शब्दात किंवा टक्क्यात वर्णन करता येत नाही. आणि या सिद्धांताची प्रासंगिकता रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रात देखील सिद्ध होताना दिसते.
वालुकी लष्करी तळावर रशियन सैनिकांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या अनेक महिलांनी हजेरी लावली. रशियाच्या सीमेवरील लष्करी तळ युक्रेनच्या खार्किव ओब्लास्टपासून अवघ्या ३० मैलांवर आहे. लष्करी अधिकार्यांना त्यांनी पतींचा शोध घेऊन त्यांना घरी परत नेण्यास मदत करण्याची विनंती केली.
“ते जखमी आहेत, तरीही त्यांना लढण्यास भाग पाडलेजात आहे, आणि अधिकारी आम्हाला मदत करण्यास तयार नसतील तर आम्ही युद्धक्षेत्रात प्रवेश करून त्यांची सुटका करू,” असे जमलेल्या लोकांनी पत्रकारांना सांगितले.
“आंदोलकांचा वेस्टर्न मिलिटरी डिस्ट्रिक्ट मधील अधिकाऱ्यांना दणका”
वेस्टर्न मिलिटरी डिस्ट्रिक्टमधील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील एक गट सेंट पीटर्सबर्गमध्ये शांततापूर्ण ठिया आंदोलन करीत आहे. युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या परिसरात लढण्यासाठी लष्कराने अप्रशिक्षित नागरिकांना ताबडतोब पाठवणे थांबवावे अशी त्यांची मागणी.
सुरुवातीला सर्व आवाज ऐकू येत असून दुर्लक्ष करण्यात आले, लेखी अहवाल स्वीकारण्यास नकार दिलागेला. जवळजवळ दोन महिने त्यांना कोणीही भेटले नाही, निराश असून देखील सैनिकांच्या पत्नी, माता आपल्या जागेवर डटून राहिल्या. अखेरीस, दबावात येऊन लष्करी अधिकारी १५ नोव्हेंबर रोजी शिष्टमंडळाला भेटले. पश्चिम बेल्गोरोड प्रदेशात पुरेसे प्रशिक्षण व हत्यार न देता तैनात केलेल्या ४०० जणांच्या नातेवाईकांची पत्रे (अपील) त्यांनी स्वीकारली.
“युद्धविरोधी भूमिका निडरपणे मांडण्याची महिला पत्रकारांनेच केली होती सुरवात”
पुतिन सरकारकडून पत्रकार झान्ना अगालाकोवा यांचा अनेकदा सत्कार झाला. त्यांना दोन राज्य पदके देखील देण्यात आली. यावर्षी मार्च महिन्यात अगालाकोवा यांनी पुतिन तर्फे देण्यात आलेली पदके परत करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने फेसबुक पोस्टमध्ये आपला निर्णय मांडला. पुतिन यांचे नेतृत्व देशाला खोल खड्यात नेत असल्याची टीका देखील केली .
टीव्हीवर तसेच इतर माध्यमांवर सरकारचे कडक नियंत्रण असून नागरिकांना युक्रेन युद्धाबाबत साफ चुकीची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. अगालाकोवा यांनी सरकार चालवत असलेल्या ‘चॅनल वन’ वार्ताहारपदावरून राजीनामा दिला.
त्याच महिन्यात, महिला पत्रकार मरीना ओव्हस्यानिकोवा यांनी देखील युद्धाचा निषेध करत राजीनामा दिला. बातम्यांचे थेट प्रेक्षेपण सुरु असताना “युद्ध लढाई नको,” असे लिहिलेला फलक प्रेक्षकांना दाखविला. या कृत्यामुळे त्यांची पोलीसांनी १४ तास ताब्यात घेऊन चौकशी केली तसेच कोर्टाने ३०,००० रूबल दंड भरण्यास भाग पाडले.
पण घाबरून माघार घेणे ४४ (44) वर्षीय ओव्हस्यानिकोवा यांना मुळीच पटत नाही. यामुळे, ऑगस्ट महिन्यात त्यांनी थेट मॉस्कोच्या मध्यभागी असलेल्या क्रेमलिन समोर एकटेच उभे राहून आंदोलन केले. ‘पुतिन एक खुनी आहे; त्याचे सैनिक फॅसिस्ट आहेत,’ असे लिहिलेला बॅनर घेऊन अनेक तास उभे राहीचे धाडस दाखविले, लोकांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले.
सरकारने त्वरित ओव्हस्यानिकोवा यांनी सैन्याविषयी खोट्या बातम्या पसरवल्याचा दावा करत खटला दाखल केला. तिला नजरकैदेत ठेवण्यात आले. असा आरोप सिद्ध झाल्यास दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यामुळेच ओव्हस्यानिकोवाने आपल्या मुलीसह रशियातून पळ काढला आणि अज्ञात युरोपियन देशात आश्रय मागितला.
“संभाव्य परिणामांची माहिती असूनही महिलांचा सहभाग वाढत आहे”
रशियातील ‘ओव्हीडी’ मानवाधिकार संघटनेचे वकील डारिया कोरोलेन्को महिला आंदोलकांना कायम मदतीचा हात देतात.
शांतपणे आंदोलन करणाऱ्या स्त्रियांना व लहान मुलींना देखील पोलीस ताब्यात घेतात. तुरंगात झोपण्यासाठी तसेच खाण्यापिण्याची सोय नसते. याशिवाय, त्यांना लैंगिक हिंसाचाराच्या धमक्यांचा सामना करावा लागतो. पण तरी देखील महिला हिंमत न हारता पून्हा रस्त्यावर उतरतात असे चित्र दिसून येते. उदाहरणार्थ, न्यायालयाच्या दस्तऐवजात असे दिसून येते की सुरुवातीच्या काळात युद्धाविरुद्धच्या निषेध आंदोलनात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी ३० टक्के स्त्रिया होत्या. महिलांचा आंदोलनात सहभाग सातत्याने वाढत आहे. २१ आणि २४ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली आंदोलने ही रशियामधील सर्वात मोठी निदर्शने होती. ओव्हीडीने जारी केलेल्या आकडेवारी प्रमाणे, २१ सप्टेंबर रोजी निदर्शनांदरम्यान अटक करण्यात आलेल्या १, ३८३ व्यक्तींपैकी ५१% महिला होत्या. नंतर, २४ सप्टेंबर रोजी आणखी ८४८ जणांना ताब्यात घेण्यात आले, त्यात ७१ टक्के महिलांचा समावेश होता, अशी आकडेवारी कोरोलेन्को यांनी मांडली.
“आंदोलनात सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या वाढण्यामागे कोणती कारणे आहेत?”
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधक एला रॉसमन यांच्या मते, ही रशियात वाढत्या स्त्रीवादी चळवळीची चिन्हे आहेत. या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस आंदोलनात सहभागी असलेल्या पुरुषांना अटक करून सैन्यात सामील होण्यासाठी भाग पाडत आहेत. अशा कारवाईच्या भीतीमुळे पुरुषांचा सहभाग कमी दिसतो.

“हुकूमशाही विरुद्ध लढा”
फेमिनिस्ट आँटीवॉर रेझीस्टन्स (एफ. ए. आर) हा समूह कायम चर्चेत राहतो. गटातील सदस्य विविध शहरात सध्या काळे कपडे घालून हातात पांढरी फुले धरून पुतिन यांना युद्ध संपवण्याचा आग्रह करतात.
पुतिन यांनी सप्टेंबरमध्ये राखीव सैन्याची जमवाजमव अर्थात देशातील नागरिकांना जबरदस्ती सैन्यात भरती करण्याचा कार्यक्रम सुरु केला. तरुणांसाठी सैन्याकडे कपडे अपुरे, जुनी हत्यारे, वैद्यकीय सुविधांचा अभाव व जेवणात खराब अन्न दिले जाते. जखमी झाल्यास तसेच मरायला सोडले जाते. पुतिन यांच्या निर्णयाचा थेट परिणाम लोकांच्या आयुष्यावर होतो.
“युद्धक्षेत्रात तुमचा भाऊ, किंवा मुलगा असू शकतो. सामान्य लोकांनी युद्धात सामील व्हावे, मरावे आणि मृतदेह म्हणून परतावे अशी आमची मुळीच इच्छा नाही,” असे एफ. ए. आर च्या समन्वयक लोल्जा नॉर्डिक पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.
नॉर्डिक गेली अनेक वर्ष रशियातील महिलांवर होणाऱ्या हिंसाचारा विरोधात आवाज उठवतात. युद्धाचा निषेध केल्याची त्याना खूप मोठी किंमत मोजावी लागली. सायबर हल्ले, पोलिसांचे घरावर छापे व जिवेमारण्याच्या धमक्या मिळत असल्याने रशियातून पळ काढून त्या एस्टोनियातील टॅलिन येथे स्थायिक झाल्या.
फेब्रुवारीपर्यंत, बहुतेक रशियन लोकांचा असा विश्वास होता की राजकीय निर्णयांचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत नाही. पण पुतिनने लोकांना युद्धात सामील होण्यास केलेल्या आव्हानानंतर हजारो लोक देश सोडून पळून गेलेत. अनेक जण अज्ञातवासात गेले आहेत. काहींचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर अनेक तरुणांनी प्रशिक्षण शिबिरात आत्महत्या देखील केली. मूर्खपणाचा कळस म्हणजे जुन्या सोव्हिएत नेत्यांचे उदाहरण देऊन लोकांना मूर्ख बनवून युद्धात तैनात केले जाते, आणि मरण्यासाठी सोडले जाते, असे नॉर्डिक म्हणाल्या.
लेखक: नित्तेंन गोखले
My column was first published in Pune’s Prabhat Daily, on Nov 24, 2022

Leave a comment